अबोली....(सरतं... वर्ष...)

मना-मनात आनंदोत्सव नववर्षाचा रुंजी घालतोय ! सरत्या वर्षाला निरोप देताना भरून तर येतयं.... मागे वळून पाहताना  झरझर सरकू लागला तिचा गतकाळ....
३१ डिसेंबर किंवा १ जानेवरी कधी साजरे केल्याचे तिला आठवावे लागले. लहानपणी टि.व्ही. समोर बसून पाहिलेला 'गजरा'! काॅलेजमधील आयुष्यात जिवलग मैत्रीणीसोबत घालविलेली जूहू किनाऱ्यावरिल ३१ डिसेंबरची संध्याकाळ ! १जानेवारीला पार्लेश्वर मंदिरातील श्री शंभो, आणि श्रीगणेशाचे दर्शन!
किती सुंदर होते ते दिन ! 
लग्नानंतर चित्र थोडे बदलले. त्याला मित्र परिवार भरपूर त्यामुळे त्याचे मित्रांसाठी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन ! लग्नाआधी या सर्व गोष्टींची कल्पना असल्याने तीने लग्नाच्या पहिल्या वर्षी सन१९९९ डिसेंबर ३१ तारखेला त्याला पत्र लिहिले आणि ते पत्र हळूच त्याच्या बॅगेत ठेवले आणि रात्री १२ वाजता New year चा काॅल विश करण्यासाठी आल्यावर तिने ते पत्र त्याला वाचायला सांगितले... त्यानंतर दरवर्षी पत्राचा सिलसिला सुरू झाला.
पण आज पत्र वाचणारा चोरपावलांनी निघून गेला... 
जीवलगा .....
या क्षणाला मी पत्र लिहिते आहे. पत्र वाचायला तुला खूप आवडायचे ना!!! 
पत्र वाचताना तुझे डोळे बोलायचे.... चेहऱ्यावर मंद स्मित असायचे..... आताही तुझा हसरा चेहरा डोकावतोय आणि नकळत अश्रूही ओघळताहेत गाली
फक्त ते पुसायला तुझे अदृश्य हात आहेत....वास्तव नाही हे जड जाते.....
प्रत्येक क्षण तुझ्या आठवणींशिवाय पूर्ण होत नाही. आपल्याबाबतच्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी...आठवल्या कि मनाला एक तरल, सुखद, आनंददायी,अमृतासम मला संजीवनी देऊन जातात.

प्रिय 
मुन्ना, बाळू, पुरू
ही तिन्ही नावे तुझीच पण तुझं खरं नाव पुरुषोत्तम.. हे बऱ्याच जणांना माहित नव्हतं अगदी मलाही .. खरं  तर आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखत होतो पण मैत्री नव्हती! अम्माच्या आजारपणामुळे तुझे आमच्या घरी येणे वाढले. अम्माच्या आजारपणात तिच्याशी गप्पा मारून तू तिचे मनोधैर्य वाढवलेस. पुढे आपल्या लग्नानंतरही  तू माझा मित्रच राहिलास. प्रत्येक गोष्ट मी तुझ्याशी शेयर करू शकत होते. तुझा मनमिळावू स्वभाव, समजूतदारपणा, सारासार विचार कारण्याची पद्धत मला अचंबित करे. तुला कोणी शत्रू नव्हते.  मित्र.. तुझे जीव की प्राण ! मित्रांसाठी तू त्यांच्या गळ्यातला ताईत ! लग्नाआधीपासूनच मला हे माहित असल्याने त्यांच्या मैत्रीत मी बायको म्हणून राहण्यापेक्षा मैत्रीण म्हणून राहणे पसंत केले. आम्ही दोघेही एकमेकांना समजून घेत होतो. तुझ्याबरोबर असताना मग अंधेरीचे  चाळीतले घर असो किंवा आमचे गाव असो किंवा गोकुळधामच्या भाड्याचे घर असो मी सुखात होते कारण तुझा सहवास होता.  आज तू आमच्यात नाहीस याला अडीच वर्षे होऊन गेली.
किशोरच्या प्रत्येक गाण्यातून तू गातानाचा  भास होतो. जगजितसिंगच्या गजलेतून तू आर्त  साद घालतोय असे वाटते. मला नेहमी म्हणायचास "क्या मौसम है.... ये दिवाने दिल .. अरे चल काहीं दूर निकल जाए ।" पण तू मला अर्ध्यावर सोडून निघून गेलास खुप दूर मला न घेता माझा निरोप न  घेता. तू असं जाऊच कस शकलास ?  
होतास तू जेष्ठ पुत्र, लाडका जावई, नातू, पुतण्या, भाचा प्रेमळ दादा, भाओजी, स्नेहाळू  मित्र, मायाळू मामा, काका, दीर, हॅंडसम पप्पा, डॅडा, बाबा, सर्व नाती संभाळलीस जीवापाड या नात्यांना सांभाळताना सतत सावलीसारखी असणारी मी..जीचा तू जीवलगा होतास  तू.. तुझ्याशिवाय सावली रे कसली माझी ? तुझ्यामुळे अर्थ होता  जीवनाला आता हे जगणे केवळ आणि केवळ फक्त तुला दिलेल्या वचनांची पूर्तता ! सर्वानाच पोरकं करून निघून गेला  देवाला ही तू इतक्या लवकर हवा होतास का रे ???  

तुझीच 
प्रणू 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

आये ऽऽऽऽऽ

प्रेमाची गोष्ट