वेड

 प्रिय दुष्ट (प्री... फ्रूट अँड नट)
मंद वाऱ्याची झुळूक यावी....अवचित पावसाची सर यावी तशी तुझी आमच्या आयुष्यात आलीस. खरं तर त्यावेळी आम्ही दोघंही एका वेगळ्याच फेऱ्यात अडकलो होतो. पल्लू आमच्यापासून दुरावली होती, त्यात अनेक उपचार करूनही आमचे इप्सित साध्य होत नव्हते. शरीराने-मनाने दोघेही थकलो होतो. सर्वांसाठी चेहऱ्यावर हसरा मुखवटा धारण केलेला... मुखवट्यामागे आर्त वेदना जी फक्त आमच्याही नकळत आम्ही दाबलेली...
अश्या काळात तू अवतरलीस आमची कन्या म्हणून.. माझी दुष्ट... यांची बेटा...! तुझे मम्मा म्हणणे माझ्यातल्या आईला सुखावणारे होते. यांच्याशी प्रत्येक कामात सल्ला- मसलत,चर्चा व्हायच्या... गावी जाण्यापासून ते गुंतवणुकीपर्यंत ...!
तू जेव्हा जेव्हा अंधेरीच्या घरी यायचीस तेव्हा तेव्हा निघताना तुला नेहमी आम्ही थांबवावे असे वाटे..पण नाही थांबवायचो... तू तुझ्या काळाचौकीच्या घरी जावीस इथे गुंतू नयेस असे वाटायचे. तुझ्या घरच्यापासून तोडणे आम्हाला नको होते. आम्ही खूप प्रयत्न केले की तू आमच्यापासून दूर व्हावीस.. पण जितके आम्ही तुला तुझ्या पालकांकडे ढकलत होतो तेवढीच तू आमच्याकडे ओढत होतीस. शनिवार- रविवार येता येता तुझे आमच्याकडे रोज येणे जाणे सुरू झाले.
आमच्या गावापासून ते नातेवाईकांपर्यंत तू आमची मानसकन्या आहेस हे दृढ झाले. सर्वांना तू आपलेसे केले.
योगेशच्या लग्नात तुझा आणि शीतलचा मोलाचा वाटा होता. त्यानंतर पप्पा(सासरे) गेले तेव्हाही तू होतीस..
जोगेश्वरीचे घर तर तू आणि मी एक एक वस्तू मस्जिदहून जमा करून सजवले कारण यांना आपल्याबरोबर येण्यास वेळच नव्हता. फोटो पाठवून फोन करून आपण त्यांना हैराण करायचो तीही एक मज्जाच !
विशूचा जन्म झाला तुला केवढा आनंद... त्याला मालिश सुद्धा करायचीस..  रात्री ऑफिसहून आलीस की तुझे खेळणे होते ते... सर्वात छोटा भाऊ!!! आतापर्यंत तू त्याला उचलून घ्यायचीस ! तुम्ही दोघं काय हळूहळू बोलायचा देवच जाणो! त्याला विचारलं तरं मिश्किल हसायचा !
हे गेल्यानंतर तू तर माझ्या सावलीसारखी राहिलीस. अनपेक्षितपणे  त्यांच्या जाण्याचा हा धक्का पचवणे माझ्यासाठी खूप कठीण होते. हळूहळू मी सावरत होते ... घाव होता पण रडत बसणं तत्त्वात बसत नव्हतं. गणपतीला गावी जाण माझ्यासाठी आव्हान होते...लोकांच्या नजरेत अरेरे... देवाने पदरात एक मूल तरी टाकायचे होते... ही वाक्य मला कुरतडत होती पण तरीही तू मला का लक्ष देतेस?.. मी आहे ना ! असा आश्वासक सूर लावायचीस.
सप्टेंबरमध्ये पप्पा (माझे) गेले तेव्हा खरंच मी पोरकी झाले ही भावना दुणावली. मला रोज फोन करून चौकशी करणारे आता हयात नाहीत आणि त्यांचे फोनही येणार नाहीत हे शल्य! अम्माच्या आजारपणामुळे
ती तिच्या कोशात गुरफटलेली... 
खरं तर अम्माच्या आजारपणामुळे मी लहान वयातच मोठी झाले. अम्माच्या लहरीपणाचा, विसराळूपणाचा मला खूप त्रास होत होता पण तो कसा स्वीकारावा हे तूच सांगितलेस...
 या दरम्यान आपण खूप फिरलो. अलिबाग, मालवण, देवगड, माथेरान, दापोली बरीच तीर्थक्षेत्रेही पाहिली अष्टविनायक, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, नवरात्रांत नऊ देवींचे दर्शन, महडचा गणपती आपण वर्षातून अलिबाग आणि मालवण तीनदा-चारदा करायचो. ॲक्टिव्हाने अलिबागपर्यंत गेलो. तुझ्यामागे बसताना कधीच भीती वाटली नव्हती. एवढ्या वर्षात 
 एकदा १ मे ला आपण घरी जाताना अपघात झाला तेव्हा मी रस्त्यावर सरळ पोटावर घसपटत गेले. तू मला कुठेच दिसेना मी खूप घाबरले इकडे तिकडे पाहिले तेव्हा तू गाडी बाजूला करून उठत होतीस .... गुढघ्याच्या खालच्या बाजूने रक्त बंबाळं ... स्वतः जखमी होतीस पण मला सारखी विचारत होतीस तुला लागलं नाही ना... Ok आहेस ना! कसेबसे रिक्षाने नित्यानंद हॉस्पिटल गाठले. तुला टाके पडले तरी तू माझीच काळजी करत होतीस.
मला कॅम्पहून आणलेस तेव्हा खूप काळजीत होतीस. ऍडमिट केल्यानंतर ICU मध्ये नेल्यावर घाबरलीस पण बाहेर आल्यावर किती बडबड केलीस. प्रकृतीची हेळसांड केल्याबद्दल ! आजतागायत ते सुरूच ! नारळपाणी, ताक, प्रोटीन बार, बिस्कीट यांचा रतीबच सुरू केलास.  
काळाचौकीच्या घरीही तू तेवढ्याच आपुलकीने मायेने करीत होतीस. घरच्या किराणा सामानापासून बिलांपर्यंत तू एकहाती कारभार पाहत होतीस. तुझ्या पप्पांचे आजारपण असो किंवा अक्षूचे लग्न तुझी खूप धावपळ होती. एक मुलगा करू शकणार नाही एवढे तू केलेस. अक्षूच्या लग्नात तू किती सुंदर दिसत होतीस ! तुझ्या प्रत्येक निर्णयात तू ठाम होतीस. 
 यावर्षी तू ठरवूनच टाकले होतेस की मला एकटीला सर्व व्यवहार करायला लावायचे. नवीन वर्षात आपण आपल्या स्वतःसाठी नेहमीच्या ठिकाणी न जाता वेगळ्या ठिकाणी फिरायला जाऊ. ते ही वीणा वर्ल्ड कडून ! हे sucess झाले की फॉरेन टूर करू! सुचित्राकडे जपानला जाऊ. दरवर्षी तू तुझी सुट्टी इतरांसाठी घालवतेस. हॉस्पिटलच्या फेऱ्या काही चुकत नाहीत.  तुझी पन्नाशी धड साजरी करू शकली नाहीस. आता तुझी 55 वी आपण साजरी करू ! पण नियतीने वेगळीच योजना आखून ठेवली होती. आता कसला वाढदिवस आणि कसलं काय? मला काही ठरवण्याची इच्छा करण्याचीही भीती वाटू लागली.. मी ठरविलेले कधी होत नाही म्हणून मी इच्छा करणेच सोडून दिले होते तू मला या विचारांपासून परावृत्त करीत होतीस. तू ठरवत नाहीस म्हणून होत नाही. तू मात्र जे मनात येईल ते खर करीत होतीस ते पूर्ण करण्यासाठी धडपड करीत होतीस. त्यामुळे तू पुढाकार घेऊन सगळे बुकिंग केलेस.
31 जानेवारीला आपण मुंबईहून  सिमला कुलू मनाली साठी निघालो. केवढी खुश होतीस मला विमानात पहिल्यांदा बसवताना ! माझ्या बकेट लिस्ट मध्ये ती दुसरी इच्छा होती. पहिली इच्छा सिमल्याला बर्फ पडताना अनुभवायची ! कारण या दोन्ही तुझ्या लहानपणीच्या इच्छा मी पूर्ण करेन असं बोलली होतीस.
आणि खरच आम्ही 1फेब्रुवारीला रात्री भुरूभुरु पडणाऱ्या बर्फात भिजलो. 2 फेब्रुवारीला रोहतांग व्हॅलीला गेलो. 3 फेब्रुवारीला हिडिंबा मंदिरात जायचे होते.. तू मला एकटीला जायला सांगत होतीस. त्यावर मी चिडले .. मुंबईला परत जाऊ या म्हटले पण तू मला जबरदस्ती पाठवलेस. वेटरकडून prescription प्रमाणे  औषधे मागवून घेतली. तुला दुपारी जेवण भरवले औषध दिलं आणि झोपलो. संध्याकाळी कॉफीसाठी मलाच एकटीला जा म्हणालीस. तेव्हाही मी कुरकुर केल्यावर तू कधी माझे ऐकू नकोस. असे सुनावलेस. शेवटी तुझी कॉफी रूम वर आणण्यास सांगून मी अर्धा कप कॉफी घेऊन वर आले. 
तू washroom मध्ये होतीस. वेटर कॉफी टेबल वर ठेऊन निघून गेला. तू बाहेर आलीस  माझ्या खांद्यावर हात ठेवून चालत आलीस.. हातपाय वळताहेत असे म्हणालीस. तुला बसवलं... गरम पाणी मागितलेस अर्धे प्यायलीस.. ग्लास माझ्या हातात ठेऊन ठेव .. बस झाले म्हणालीस आणि मागे मागे तोलताना दिसलीस मानेखाली पटकन हात घातला.. जवळ घेतले... पण नाकातोंडातून फेस येऊन तू खाली कोसळलीस. चटकन तुझे तोंड पुसले धावत लॉबी मध्ये सर्वांना हाका मारल्या सगळे धावत आले तुला बसवले. तुला प्रिया..प्रिया अश्या हाका मारत होते ... तू डोळे उघडलेस मला पाहिलेस आणि ... अचानक तू डोळे मिटून घेतलेस. कार मध्ये बसवून हॉस्पिटल गाठले पण सगळेच शांत झाले.. मी सुन्न सुचत नव्हतं काय झाले काय करायचे. पोलिस आले .. यांच्यावेळीही मी यांना घरी आणल्यावर मला पोलिस स्टेशनला घेऊन गेले होते जबानी साठी.. तेव्हाही टाहो फोडू शकले नाही आणि आताही नाही... मला आठवतही नाही की मी कोणाला पहिला फोन केला? दरम्यान काय काय झाले? माझ्याशी रोज वाद घालणारी, स्वतःसाठी जग, माझाही विचार करू नकोस, तुला जे आवडत ते कर असं म्हणत वेड्यासारखं प्रेम करणारी माझी लेक निपचीत पडली होती. मी हतबल होते. इतरांनी कोणतेही तर्क लावू दे पण हे तितके सत्य आहे की लेकीने निर्व्याज प्रेम माझ्यावर केले पण ममतेत मीच कुठेतरी कमी पडले.
 साधा सर्दी-खोकला संध्याकाळी तुला माझ्या पासून इतके दूर नेईल याची स्वप्नातही कल्पना नव्हती.
 तुझं आणि माझं नेमकं नातं कुठलं हे सांगता येणं कठीण आई- मुलीचं, बहिणी- बहिणीचं, मैत्रिणीचं की गुरू- शिष्याच !
सर्व नाती जपता जपता तू दूर भुर्रकन उडूनही गेलीस. माझ्या हातावर तुरी देऊन ! तुझे जाणं मी हयात असेपर्यंत भळभळणारी जखम आहे जी कधीच भरू शकणार नाही.
माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तू जीवाचा किती आटापीटा केलास !  
तुझा यापुढचा अनंतातील प्रवास सुखकर होवो ! .. माझे अश्रू तुला बाधक ठरणार नाहीत.. याची काळजी घेईन.
तुझी
मम्मा 
(Sweetheart Mumma, Dairy milk) 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आये ऽऽऽऽऽ

प्रेमाची गोष्ट