प्रेमाची गोष्ट
खरंच प्रेम चौकटीत बसू शकेल का? नक्कीच नाही प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या... आज मागे वळून पाहताना आपल्या नात्याची गुंफण नियतीने किती नकळतपणे गुंफली हे दोघांनाही कळलं नाही. एक मात्र नक्की आपल्याला बऱ्याचदा या नात्याने स्वभावातील वेगवेगळे पैलू दाखवून दिले. लग्नानंतर ही मित्र-मैत्रिणीचं नातं कायम राहिलं.. नवरा बायकोच नातं तर होतं पण मैत्रीचं नातं दृढ होत गेलं. नातं कोणतंही असो त्याला विश्वासाचा पाया मजबूत असावा लागतो. तसा विश्वास आपल्या नात्यात होता म्हणूनच ते कधी तकलादू ठरलं नाही. उगवणारा प्रत्येक दिवस आठवण घेऊन उगवतो. सूर्याला पाहताना, चंद्राला पाहताना, आपल्या नेहमीच्या रस्त्याने प्रवास करताना क्षणोक्षणी आठवणी हळू हळू धुकं पसरावे तश्या पसरतात. एक गोष्ट मात्र नक्की या धुक्यात बाकी सर्व हरवते पण तुमची छबी मात्र स्पष्ट मूर्त असते. गेल्या पाच वर्षांत खूप काही बदललं असले तरी एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे तुमचा हसरा चेहरा.. दुःखात असते तेव्हा उभारी देतो. आनंदात असते तेव्हा प्रेरित करतो. मुळात तुमचा स्वभाव तसाच होता. माझ्या मनात काय चाललं हे न सांगताही कळायचे. एकमेकांच्या नज...