अबोली....(सरतं... वर्ष...)
मना-मनात आनंदोत्सव नववर्षाचा रुंजी घालतोय ! सरत्या वर्षाला निरोप देताना भरून तर येतयं.... मागे वळून पाहताना झरझर सरकू लागला तिचा गतकाळ.... ३१ डिसेंबर किंवा १ जानेवरी कधी साजरे केल्याचे तिला आठवावे लागले. लहानपणी टि.व्ही. समोर बसून पाहिलेला 'गजरा'! काॅलेजमधील आयुष्यात जिवलग मैत्रीणीसोबत घालविलेली जूहू किनाऱ्यावरिल ३१ डिसेंबरची संध्याकाळ ! १जानेवारीला पार्लेश्वर मंदिरातील श्री शंभो, आणि श्रीगणेशाचे दर्शन! किती सुंदर होते ते दिन ! लग्नानंतर चित्र थोडे बदलले. त्याला मित्र परिवार भरपूर त्यामुळे त्याचे मित्रांसाठी ३१ डिसेंबरचे सेलिब्रेशन ! लग्नाआधी या सर्व गोष्टींची कल्पना असल्याने तीने लग्नाच्या पहिल्या वर्षी सन१९९९ डिसेंबर ३१ तारखेला त्याला पत्र लिहिले आणि ते पत्र हळूच त्याच्या बॅगेत ठेवले आणि रात्री १२ वाजता New year चा काॅल विश करण्यासाठी आल्यावर तिने ते पत्र त्याला वाचायला सांगितले... त्यानंतर दरवर्षी पत्राचा सिलसिला सुरू झाला. पण आज पत्र वाचणारा चोरपावलांनी निघून गेला... जीवलगा ..... या क्षणाला मी पत्र लिहिते आहे. पत्र वाचायला तुला खूप आवडायचे न...