प्रेमाची गोष्ट


खरंच प्रेम चौकटीत बसू शकेल का? नक्कीच नाही प्रत्येकाच्या प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या... आज मागे वळून पाहताना आपल्या नात्याची गुंफण नियतीने किती नकळतपणे गुंफली हे दोघांनाही कळलं नाही. एक मात्र नक्की आपल्याला बऱ्याचदा या नात्याने स्वभावातील वेगवेगळे पैलू दाखवून दिले. लग्नानंतर ही मित्र-मैत्रिणीचं नातं कायम राहिलं.. नवरा बायकोच नातं तर होतं पण मैत्रीचं नातं दृढ होत गेलं. नातं कोणतंही असो त्याला विश्वासाचा पाया मजबूत असावा लागतो. तसा विश्वास आपल्या नात्यात होता म्हणूनच ते कधी तकलादू ठरलं नाही.
 उगवणारा प्रत्येक दिवस आठवण घेऊन उगवतो. सूर्याला पाहताना, चंद्राला पाहताना, आपल्या नेहमीच्या रस्त्याने प्रवास करताना क्षणोक्षणी आठवणी हळू हळू धुकं पसरावे तश्या पसरतात. एक गोष्ट मात्र नक्की या धुक्यात बाकी सर्व हरवते पण तुमची छबी मात्र स्पष्ट मूर्त असते.
गेल्या पाच वर्षांत खूप काही बदललं असले तरी एक गोष्ट बदलली नाही ती म्हणजे तुमचा हसरा चेहरा.. दुःखात असते तेव्हा उभारी देतो. आनंदात असते तेव्हा प्रेरित करतो. मुळात तुमचा स्वभाव तसाच होता.
माझ्या मनात काय चाललं हे न सांगताही कळायचे. एकमेकांच्या नजरेतून आपण बरेच बोलायचो... डोळ्यातून व्यक्त व्हायचो. आज फोटो पाहताना हेच जाणवत फरक एवढाच की तुम्हाला मी स्पर्श करू शकत नाही आणि तुम्ही मला.
आमच्या गप्पा रंगायच्या त्या डॉक्टरच्या दवाखान्यात नंबर येईपर्यंत...  इतर जण त्रासिक चेहऱ्याने बसत आणि आपण आरामात दलाल डॉक्टरांच्या दवाखान्यात नंबर येईपर्यंत cool....कधी गावी जाताना ट्रेनच्या प्रवासात तर कधी बाईकवरून जाताना.... गप्पांचे विषय कोणतेही...
आपण कधी कधी प्रवासात एकदम अनोळखी होऊन बोलायचो..... काय मि. राऊळ किती दिवस मुक्काम? बायको नाही आली का?? सुट्टी नाही वाटते.... मी तुमच्या बरोबर आहे हे माहित आहे का तिला?  तुम्ही हो... ना... अशी उत्तरे देऊन म्हणायचा ती व्हिडिओ कॉल करणार आहेच वगैरे...सहप्रवासी अंदाज बांधत.. काही प्रश्नांकित... आशंकित नजरेने बघत ...
बाईकच्या प्रवासात तर तुम्ही किती गाणी म्हणायचा मुंबईपेक्षा गावी तुम्हाला गाणी म्हणत प्रवास करणे आवडायचे.. किशोरकुमार संचारायचा.
अजब रसायन होत तुमचे ! 
या सगळ्या गोष्टी खूप मिस करते... प्री चे या बाबतीतील अनुभव फार वेगळे... तुमच्या दोघांमुळे मी खूप सुख, आनंद उपभोगला.
पण दोघांनीही मला फसवले.... माझ्या आयुष्यातून किती अचानक निघून गेलात ! तुम्हांला वेळ नसला की तुम्ही आम्हांला दोघांना फिरायला, खरेदीला,  सिनेमा पहायला जा म्हणायचा आणि आल्यावर  गरमागरम चहा आयता मिळायचा !
तुम्ही गेलात आणि प्री ने सावरले... तिला मी तिच्यावर अवलंबून राहणे नको होते. माझा निर्णय मीच घ्यावा याबाबत आग्रह असायचा.. ती स्वतः बिनधास्त होती. त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार कधीच केला नाही. खूप फिरणे, वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्यपदार्थांची चव चाखून बघायला आवडायचे. वेगवेगळ्या ऑनलाईन वस्तू मागविण्यात एक्सपर्ट !  
मनालीला काय गेलो मी माझे दुसरे हक्काचे माणूस गमावले. तिला माझी बकेट लिस्ट कुलु- मनाली ट्रिप पूर्ण करायची होती. अट्टाहासाने घेऊन गेली. एकत्र विमानप्रवास, चंदिगडची थंडी, सिमलाची सैर सगळा अनुभव प्रसन्न आणि आनंद देणारा होता. दोन दिवस कसे गेले कळलेच नाही. तीन फेब्रुवारीची संध्याकाळ माझ्यासाठी नियतीने वेगळीच लिहून ठेवली होती..
माझी लेक प्री.. निपचीत पडली होती.  मी सुन्न होते. तिचे पार्थिव मुंबईला आणताना यांत्रिकपणे सर्व सोपस्कार पार पाडत होते. बैजू, जगदीश, शुभम, योगेश,शैलेश, माझ्या माजी विद्यार्थिनी यांना माझी काळजी होती. सारखे फोन करून माझी खुशाली विचारत होत्या. धीर देत होत्या. काही लागलं तर सांगा म्हणत होत्या.  मम्मा विमानातून सूर्योदय खूप सुंदर दिसतो आपण रात्री निघणार आपण मिस करणार असे म्हणाली होती. ५ फेब्रुवारीला सकाळी आकाश पाहताना वाक्य आठवले ...टचकन डोळ्यात पाणी आलं... सूर्योदय खूप सुंदर दिसत होता पण त्याकडे बघणेही नकोसे झाले.
प्रियाचे जाणे पोकळी निर्माण करणारे होते.  हे गेल्यानंतर तीच होती माझ्या प्रत्येक सुख- दुःखात ...  माझ्या आजारपणात आईसारखी काळजी घ्यायची.
आज तिचे नसणं माझ्यासाठी खूप त्रासदायक आहे.
सप्टेंबरमध्ये पप्पा गेले तेव्हा  तिनेच मला चार गोष्टी सांगितल्या. पप्पा रोज फोन करायचे एक सवय होती त्याची पण त्यांचा फोन आता कधीच येणार नाही.त्यांचा आवाज ऐकू येणार नाही हे पचवणे कठीण होते.
माझ्या आयुष्यातील तीन महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांच्यामुळे माझे अस्तित्व आहे.. त्याच निघून गेल्या. पप्पा वयोमानाप्रमाणे गेले..पण या दोघांचे जाणे चटका लावणारे होते आणि आहे.  एकही क्षण असा नाही की यांच्या आठवणींशिवाय मी राहू शकेन.
माणूस नेहमी विचार करतो हे भोग माझ्याच वाट्याला का? उत्तर कोण देणार? देव? वेळ? नियती? की मी स्वतः?
पप्पा, हे आणि प्रि तुम्ही  प्रेमच प्रेम दिले. तुमच्या प्रेमाच्या व्याख्या वेगवेगळ्या पण होते ते फक्त निरपेक्ष प्रेमच!
आज तुम्ही तिघही आकाशातून माझ्याकडे पाहत असाल. ही वेडी कल्पना मनात ठेऊन आकाशाचे रंग न्याहाळत बसते.

तुम्ही नसूनही,  सोबतच आहातच,
माझ्या प्रत्येक सुख-दुःखात आहात,
शरीराने दूर झालात, पण मनातून नाही,
माझ्या काळजाच्या कोपऱ्यात अजूनही आहातच...
गेलात का सोडून मला, देवास काय झाली घाई?
तुमच्याविना मला आता, कळेना कसल्याच सोई,
आभाळाच्या परी तुम्ही, सुखात असाल आता,
पण इथे रिकामी झाली, माझ्या आयुष्याची खोली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

आये ऽऽऽऽऽ