आये ऽऽऽऽऽ

 उंच..शिडशिडीत काटक बांधा ,उन्हातान्हात राबून रापलेला चेहरा ... 

पहाडी आवाज पण त्यातही एक गोडवा ...

सर्वांवर प्रेम करणारी ,सदैव प्रसन्नचित्त असणारी हि आमची आये .....

नाव सौ. काशीबाई भाऊ लाड ..

मे महिन्याच्या सुट्टीत आम्ही येणार म्हणून वाटेकडे डोळे लावून बसायची .... ज्या दिवशी आम्ही येतोय  हे कळले कि हातातले काम टाकून धावत 'माझी पोरा इली'.. असं म्हणत आंब्याच्या झाडापर्यंत येई .भाकर-तुकडा अंगावरून ओवाळून पायांना व डोळ्यांना पाणी लावल्यानंतरच घरात प्रवेश मिळे.

आजोळी गेल्यावर या सर्व आठवणी एक-एक  करून डोळ्यांसमोर चित्रपटासारख्या सरकत जातात...कधीकाळी माणसांचा राबता असलेले सुनं-सुनं घर आता  माणसांना शोधते असं वाटते. लग्नानंतर दरवर्षी गणपतीला धावती भेट केवळ आणि फक्त केवळ तिच्यासाठी मी आवर्जून जाते. शाळेत असताना कवयित्री शांता शेळके यांची 'पैठणी' कविता खूप  भावली होती ... त्या पैठणीतून आजीचे भावविश्व जसे उलगडले तसे आजोळच्या घरी जाताना माझ्या आजीचे भावविश्व उलगडू लागते. आये आत्ता जरी हयात नसली तरी तिचा वावर घरभर जाणवतो..तिची एक-एक आठवण मनाला ती तिथे असल्याची साक्ष देतात.

आम्हां सर्वांचे ती खूप लाड करी ...

नातवंडे तिचा जीव की प्राण ! आमचे हट्ट पुरवी... एकदा असच दुपारी जेवताना मला रसातल्या शेवया खाण्याची इच्छा झाली... झाले आयेने आपले जेवणाचे ताट झाकले आणि लागली शेवयांच्या तयारीला...सर्वाना गरम गरम वाढायची पण स्वत: मात्र कधीच  गरम जेवताना दिसली नाही. जेवायला बसली की  तिला तिची कोंबडी ,बैल ,आठवायचे ... ते झाले की तिच्या जावा तिच्या सुनांना हाका मारून गो वाईच ये  गो .... खाऊन जा असा प्रेमळ आग्रह मग स्वत:ला उरो किंवा न उरो ! वाडीतील कोणाचा कोण पाहुणा तिच्या दारातून कधी उपाशी गेला नाही "अगो पाठीर मारुचा पण पोटार नाय " "अन्न भुकेल्याच्या  मुखाक लावूचा आपणाक नसला तरी चलता"  अन्न म्हणजे  लक्ष्मी तिला झिडकारू नये ,तिचा राग करू नये ,जेवताना सर्वांनी मिळून जेवावे , जे पुढ्यात येते ते खावे..आपल्याला जे मिळते ते काहींच्या नशिबातही नसते.. कळत-नकळत तिचे संस्कार आमच्यावर घडत गेले.

दुपारी- रात्री जेवल्यावर ती अनेक गोष्टी सांगे... कधी स्वत:चे अनुभव , अम्माचे (माझी आई) ,मामाचे,लहानपणीचे किस्से,रानातल्या -शेतातल्या घडामोडी,भूत-खेतांच्या तर कधी देवचाराच्या गोष्टी ...गप्पांचा अखंड प्रवाही ओघ असायचा,गोष्टी सांगण्याची तिची लकब अशी झक्कास की  ऐकता ऐकता कधी निद्रेच्या अधीन व्हायचो ते कळायचे नाही. गोष्टीला सुरुवात करताना तिचा पानाचा कासवाच्या आकाराचा पितळी डबा जवळ घेई .. पान खाता-खाता जसा विड्याचा लाल रंग चढत जायचा तसा गोष्टींचा रंग चढायचा. पान खाऊन लाल झालेले तिचे ओठ खूप खुलून दिसायचे. तिची नाजूक जीवणी आणि हसऱ्या ओठांचा मला खूप हेवा वाटे.

नातवंडासाठी ती जितकी कनवाळू तितकी शेतीची कामे करताना कणखर...खंभीर होई ! बाबा (आजोबा ) तेव्हा मुंबईला नोकरी करायचे त्यामुळे आजीच गावच्या घराची, शेतजमिनीची.... कर्ती-धर्ती ! दर महिन्याला एक ठराविक रक्कम बाबा तिला पाठवीत त्यात ती हा सर्व डोलारा हसतमुखाने संभाळे. शेतीच्या आणि घरच्या कामात आये वाघ होती. त्यामुळेच गावात तिचा आणि तिच्या शब्दांचा एक दबदबा होता. तिच्या शब्दाखातर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व तिचे कोणतेही काम करायला तयार होत. शेतीच्या कामात पैरेकरी म्हणून काम करायला येणाऱ्या माणसांबरोबर  स्वत: राबायची.. त्यांच्यासाठी न्याहारीला भाकरी-भाजी, पेज ,दुपारचे जेवण ,संध्याकाळचा चहा आणि खाऊ हे ही ती तत्परतेने,आवडीने,प्रेमाने करायची एखाद्या अन्नपूर्णेसारखी ...... बाबांना कधी तिने तक्रारीचा सूर लावला नाही..

 'त्येंका कित्याक घोर?'

गावातल्यांचा ती जणू ताईत होती. प्रत्येक जण तिच्याकडे मन मोकळ करायचा..तिने दिलेला सल्ला त्यांना मोलाचा वाटायचा. मायेने जोडले गेलेले गावकरी ,पै-पाहुणे तिच्या संदर्भातील अनेक आठवणी आजही सांगतात. त्यातूनच आम्हाला समजलेली एक गोष्ट जी तिने स्वतःहून कधीच आम्हाला सांगितली नव्हती ती म्हणजे... अम्मा (माझी आई) आणि मामा लहान असताना एकदा दारू पिऊन तिच्या मोठ्या दिराने ती रानात चारीला गेली असता तिचे सर्व समान घरातून बाहेर रस्त्यावर फेकले. रानातून घरी येता-येता  तिला ही बातमी समजली. हिमतीने तिने ते  बाहेर फेकलेले  सामान निमूटपणे आत नेले. हातातला कोयता उंचावून रणचंडीकेसारखी  कडाडली "माझ्या सामानाक आणि माझ्या पोरांका हात लावून तर दाखवा." तिचे ते उग्र रूप पाहून कोण पुढे येणार! परिणाम शेतीची वाटणी...तिच्या वाट्याला देवीचे गाळू आले. देवीच्या मंदिरासमोरील खडकाळ-नापीक जमीन....देवीचा कौल मानून ती ओसाड जमीन देवीचा प्रसाद म्हणून स्वीकारला.कंबर कसून उभी राहिली . त्या जमिनीतील मोठे-मोठे खडक पहार घेऊन काढण्याच्या तयारीला लागली. सोबत तिची जोडून ठेवलेली माणसे होतीच पण त्यांच्याबरोबरीने शाळेत जाणारी मुलेही मदतीला येऊ लागली...कधी कधी ती एकटीच त्या जमिनीत खपत असे. खडक काढून झाल्यावर तिने त्या जमिनीवर माती टाकली,शेणाचा,पाला-पाचोळा,गोवऱ्यांचा वापर करून  ती जमीन सुपीक बनवली. तिच्या कष्टाचे चीज झाले. पीक जोमाने आले ... भात विकून पैसे गाठीशी जमविले बाबा पैसे पाठवीत त्यातले तिने काही साठवून ठेवलेही होते त्याच पैशांनी तिने नवीन घर बांधले, काही जमीन विकत घेतली. हे करताना तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. न डगमगता ती सामोरी गेली. ज्या दिराने सामन फेकले होते त्याच दिराला त्या नवीन घराचा अर्धा भाग  हिस्सा देऊन त्यांचा संसार मांडण्याचा अधिकारही दिला. सर्वांनी  तिला असं का केलं? असं विचारल तर तिचं उत्तरं......."पाण्यार किती काठी मारा पाणी येक व्ह्तलाच..जशी माझी दोन पोरा तशी त्येंची ....माझी दोनच आसत त्येंची चार आसत."मोठ्यांच्या भांडणात लहानांनी कधी पडू नये आणि मोठ्यांनी भांडणात लहानांका  आणू नये असा  तिचा होरा असे. मोठे मोठे  बघून घेतील लहानांनी यात पडू नये.... हे मात्र खर !

मुंबईला आली की ती मामाकडे का जास्त दिवस रहाते?आपल्याकडे का नाही राहत? असा सवाल मी अम्माला विचारून  विचारून हैराण करायचे.  ती जितके दिवस असे तितके दिवस आम्ही खूप मजेत घालवू. राहण्याचा जास्त आग्रह केला कि हसून प्रेमाने डोक्यावरून हात फिरवून म्हणे "जावयाच्या दारात जास्त दिस रव्हता नये. " अखेरची काही वर्षे तिला आपल्या लाडक्या जावयाकडे राहावे लागले.

तिचे अखेरचे क्षण .....

तिचे अखेरचे श्वास जे माझ्या आणि अम्माच्या खांद्यावर घेतले ते विसरणे अशक्यच.... !

माझ्या आयुष्यातील सर्वात जवळून पाहिलेला पहिला मृत्यू ! तो ही माझ्या लाडक्या आजीचा ! तो क्षण अजूनही माझ्या डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहतो. तिचे अचेतन शरीर जेव्हा उचलले गेले तेव्हा ती शांत झोपली आहे असेच वाटत होते. तोच समाधानी ,प्रसन्न-हसरा चेहरा ! पुन्हा कवियित्री शांता शेळकेंची पैठणी आठवली .... 

"अहेवपणी मरण आले.... आजीच्या माझ्या सोने झाले " 

ती एकटी मानसिक आणि शारीरिक लढाई लढत होती पण तिने आम्हाला कोणालाही सुतराम कल्पना येऊ दिली नाही. ना मुलाकडे तक्रार ना मुलीकडे एक चकार शब्दही काढला नाही .... अगदी शेवटपर्यंत ........!आजोबा रिटायर्ड झाल्यानंतर गावी गेले आणि तिच्या मानसिक त्रासास सुरुवात झाली.  जिने एवढा संसार एकटीने उभा केला तिलाच आजोबांनी विश्वासात घेतले नाही ... रिटायर्ड झाल्यानंतर किती पैसे मिळाले ? त्यांचे काय केले? कुठे ठेवले हे हि सांगितले नाही. तिने त्यांच्या ट्रंकेला जरा जरी हात लावला की चिडायचे ..... ओरडायचे ....सकाळी घर सोडताना बाहेर जातो सांगून जायचे ते दुपारी यायचे बरोबर कोणी ना कोणी असायचे याला चहा दे, मला कॉफी दे, याला पेज दे , कधी कधी मासे- मटन घेऊन येत याला जेवायला वाढ असे संगायचे स्वतः मांसाहार करीत नसत शाकाहारी होते हिची मात्र तारेवरची कसरत व्हायची ..... वयानुसार शक्यही होत नव्हत.. ती काही गोष्टी विसरू लागली .... पेजेत मीठ घालण्याऐवजी चहा किंवा कॉफीत घालू लागली... कधी कधी बाबा दुपारी तीन नंतर यायचे  ही न जेवता वाट पहात बसायची ....त्यांना वाढायची ... जेवणाची वेळ टळून गेल्यामुळे न जेवता राही .. रात्रीची ही तिच तऱ्हा... शेवटी परिणाम तिच्या भावनांचा उद्रेक !

आम्हाला कळले तेव्हा वेळ निघून गेली होती. मृत्यूच्या आधी दोन वर्षे तिला बाबा मुंबईला घेऊन आले.. ती तेव्हा निर्विकार होती डोळ्यातली चमक हरवली होती.. नव्हे माझी आजीच हरवली होती.... तिला काहीच आठवत नव्हते...आमची नावेही विसरली होती.. कधीतरी मध्येच तिला काही तरी आठवे बोलता-बोलता पुन्हा विसरे . या काळात ती आमच्याकडे राहत होती. ती कधी-कधी खूप आक्रमक होई ..... मध्येच उठून चालायला लागायची, कधी रडायची, कधी शून्यात पाहत बसायची , रात्रीची झोप कमी झाली, आम्ही झोपलो कि मोठ-मोठ्याने ओरडून उठवायची अंथरुणे ओढायची -चादरीवरील नक्षी तिला कधी फूले कधी लाकडे वाटायची .... शेवटी तिला डॉ. हरीश शेट्टी या मानसोपचारतज्ज्ञांकडे घेऊन गेलो. त्या उपचारांनी तिला झोप लागे.. बाकी जैसे थे....तसेच सुरु होते .त्यातच ती घरात पडली .... माकडहाड मोडले ... ऑपेरेशन झाले आणि तिने स्वतःला आमच्या स्वाधीन केले ... 

अगदी पूर्णपणे......दात घासणे, आंघोळ घालणे, सुरुवातीला ९ वारी साडी नेसवणे, (गाऊन नंतर-नंतर जबरदस्तीने घालू लागलो ),केस विंचरणे, पावडर लावणे ,जेवण भरविणे या सर्व बाबी आम्ही करू लागलो. 

मी, अम्मा, सरिता (माझी चुलतबहिण ) चेतना (मामेबहीण) .हे करताना आम्ही तिच्याशी गप्पा मारायचा प्रयत्न करायचो पण ती अवाक्षरहि काढत नव्हती.तिला भूक लागलेली सांगत नसे . जेव्हा भरवू तेव्हाच आणि तेवढेच जेवी. घास घ्यायला फक्त "आ"करी. तिने बोलण बंद केले असले तरी ती काही वेळी गालातल्या-गालात हसे. माझे सकाळचे कॉलेज, संध्याकाळी टायपिंग क्लास असत.संध्याकाळी क्लासहून येताना मी  रोज तिच्यासाठी मोगऱ्याचे गजरे घेई व तिच्या केसात माळी.  एकदा नेहमीचा गजरेवाला आला नव्हता आणि मला पार्ल्याला मोगऱ्याचा गजरा स्टेशनलाही नाही मिळाला. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ ! घरी आले ... तिचे जेवणाचे ताट घेऊन गेले तर माझ्याकडे बघतच राहिली... "आयेऽऽऽ जेय चल, बघतस काय? काय व्हया तुका ? " मीआपली विचारतेय आणि हि मात्र माझ्याकडे बघत होती,,, अचानक "गो ऽऽऽऽ  गजरे नाय आणूक? खय ठेयलस ?इसारलस काय ? हे अनपेक्षित होत मला...... माझ्याशी तिने  साधलेला हा संवाद ..... खूप वाईट वाटले .. आणि आनंदही झाला...... वाईट यासाठी की मी गजरे नाही आणले ..... आणि आनंद यासाठी की या निमित्ताने का होईना तिने संवाद साधला ! उद्या आणते सांगितले.....तशी हसली. जेव्हा-जेव्हा मोगऱ्याचे गजरे पाहते तेव्हा-तेव्हा तिचा हसरा चेहरा नजरेसमोर तरळतो !

मामा भेटायला आला की खूप खुश असायची...मामा तिच्या आवडीचे मासे आणायचा आवडीने खायची. आम्ही चिडवायचो लेक काय खाऊक घालीत नाय... मामा अंधेरीला जायला निघाला की स्वतः तयार होई जायला न बोलता.......तिची समजूत घालता-घालता आम्ही थकयचो. अंधेरीची जागा लहान असल्याने ते शक्य नव्हते..जस-जसे दिवस जात होते तस-तसे तिच्यात बदल होऊ लागले.. तिला स्वतःची चीड येऊ लागली होती,चिडायची, रागवायची,खाणं -पिणं सोडले , दोन -दोन तीन-तीन दिवस  जेवायची नाही, पाणी जबरदस्तीने भरवले तर तोंडात तसेच धरून ठेवी नंतर अम्माला पहिले की तीच्यासोर ती चूळ टाकी.... कदाचित आता परावलंबी जीण नको होत .. स्वाभिमानाने जगली होती ती! तिने अम्माशी असहकार पुकारला होता... अम्माचाही आता संयम सुटू लागला ...तिने रागाने का होईना जेवावे हा तिचा हेतु होता पण.... नाही आये तिला दाद देईना .... आये-अम्म्माचे हे शीतयुद्ध सुरु होते त्यचा परिणाम अम्माच्या प्रकृतीवर होऊ लागला. रोज-रोज तिने जरा खावे म्हणून अम्मा खूप चिडचीड करायची.मला काही सुचत नव्हत... आयेचे हाल पाहवत नव्हते... शेवटी देवालाच विचारले बाबा रे ! हिनं कोणाच वाईट केलं होत म्हणून तिला हे दिवस दाखवतोस ? या व्यापातून सोडव रे तिला ! हे मी बोलले आणि त्याच रात्री तिला ताप भरला औषध देवूनही ताप उतरत नव्हता .... 

तिसऱ्या दिवशी संध्याकाळी  मी आणि अम्मा मधाचे पाणी भरवत होतो... ते ती तोंडात घेत होती पण एका बाजूने ते सांडत होते. तिला गिळवत नव्हत. गीळताना त्रास होत होता... छातीत घरघर होती.. दोरासारखा कफ येत होता.. रात्री आठ वाजता तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.तिला गरम पाणी प्यायला देण्यासाठी अम्मा पाणी गरम करायला किचन मध्ये गेली .... मी तिला उठवून बसवले ... तिच्या मानेखाली माझा हात घातला आणि तिची मान हातावर घेतली...तिची नजर भिरभिरत होती जणू ती कोणाला तरी शोधतेय असं जाणवलं जीवाच्या आकांताने मी ....अम्म्माऽऽऽऽऽ ओरडले .. अम्मा आवाज ऐकून धावतच आली तिने ही दुसऱ्याबाजूने  तिच्या मानेखाली हात घातला... जवळ घेतले .. तिथे आणि त्याच क्षणी आयेची प्राणज्योत मालवली ......

या प्रसंगानंतर  मी मात्र कधी देवासमोर काही मागणं मागूच शकले नाही आजपर्यंत ......... आणि मागणारही नाही कारण त्यादिवशी मी अजाणतेपणी ईश्वराकडे तिचा (आयेचा ) मृत्यूचं मागितला आणि तथास्तु म्हणत त्याने तो दिला... 

कदाचित मी असे मागणं  मागितलं नसत तर आज माझी आये हयात असती.... 

दुधावरच्या सायीसारखी !



   

टिप्पण्या

  1. न पाहिलेली आये डोळ्या समोर आली....
    खुप सुंदर कलाकृती
    लिहीत रहा तू

    उत्तर द्याहटवा
  2. Vanita ... Kupach sundar... Manatalya bhavana / aathavani yanch khupach chhan shabdankan

    उत्तर द्याहटवा
  3. माझ्या या छोट्या प्रयत्नाला दाद आणि प्रोत्साहन दिल्याबद्दल धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
  4. खूप छान.. आजीमुळेच गावची ओढ जास्त असते.. या लेखातून रेखाटली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. Khup Sundar... Ekdum aaji athavli jila mi aai mhanyche... Aaji. Aaye.. aaya ya ashach asatat.....
    Asech lihit raha....
    Keep growing...
    Waiting for next Blog 😃

    उत्तर द्याहटवा
  6. ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. वनिता तुझी " आये" वाचताना नकळत अश्रु कधी ओघळले कळलच नाही. आजीची ती माणसांची ओढ, कणखर पणा, रुजुता अलगत तुझ्यातही झिरपलीय ग'. कदाचित प्रत्यक्ष मला कधी नाही व्यक्त होता येईल. पण एक सांगू मला आज
    कवयित्री इंदीरा संत यांची आज आठवण झाली.आमच्या मृण्मयीचा ह्या नविन प्रवास सुरु झालाय एव्हढ खर. मन पुर्वक शुभकामना!🌷

    वीणा संदीप शेलटकर

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. वीणा मनापासून धन्यवाद !!!
      हा प्रवास आपणां सर्वांच्या शुभेच्छांनी सुरू करतेय एवढे मात्र नक्की!!!

      हटवा
  8. खूपच छान. भावनिक लेखन पण एकदा वाचत सुटलो ते शेवटीच थांबलो.लिहीत रहा.

    उत्तर द्याहटवा
  9. Khup Sundar lihlay ....vachta vachta sgl dolyasamor yet hot ...janu aamhi anubhuvat hot .....heart touching story ♥️

    Keep writing ...
    #blogger

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

वेड

प्रेमाची गोष्ट